सातारा - सातारा तालुक्यातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणा-या विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय मुख्याध्यापकाला 5 वर्षे सक्तमजूरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी न्यायालयाने ठोठावली आहे. संजय प्रतपाराव जाधव (वय 50 रा. नांदगाव, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. जाधव हा सातारा तालुक्यातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीस होता. 9 ऑक्टोबर 2016 ला शाळेच्या आवारात ही घटना घडली होती.
हेही वाचा -राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने
संगणक खोलीत सहावीच्या विद्यार्थ्यांचा तास सुरू असताना वर्गात अंधार पडल्याने शिक्षकांनी खिडकीचा दरवाजा उघडण्यास सांगितल्याने पीडित मुलगी वर्गाबाहेर गेली होती. त्यावेळी मुख्याध्यापक जाधव याने त्या विद्यार्थीनीचा विनयभंग केला. याबाबत विद्यार्थीनीने आपल्या पालकांना याबाबत सांगितल्यानंतर 10 ऑक्टोंबर 2016 ला बोरगाव पोलीस ठाण्यात आरोपी मुख्याध्यपकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपीला अटक करून तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. सवाखंडे यांनी तपास केला.
हेही वाचा -कराडजवळ तिहेरी अपघातात टेम्पो चालक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी
या खटल्यात न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी सुनावणी दरम्यान समोर आलेले पुरावे, साक्षी तसेच दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपीला 5 वर्षे सक्तमजूरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.