महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळव्यात पूरग्रस्त निधी वाटप घोटाळ्यातील ग्रामसेवकाचे निलंबन

गतवर्षी कृष्णा व वारणा नदीला पूर आला होता. पूरपरिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीच्या घरपड अनुदानात वाळवा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा सुरू होती. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी वाळवा पंचायत समितीस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या तपासणीत वाळवा ग्रामपंचायतीच्या निधी वाटपात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. यामुळे ग्रामविकास अधिकारी संपत माळी यांचे निलंबन करण्यात आले.

By

Published : Jul 25, 2020, 2:50 PM IST

Walwa
ग्रामपंचायत वाळवा

वाळवा(सांगली) -गावातील घरपड अनुदानात भ्रष्टाचार करणाऱ्या वाळव्याचे ग्रामविकास अधिकारी संपत माळी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी निलंबनाचे आदेश दिले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी संपत माळी यांना निलंबित केल्याची माहिती दिली.

गतवर्षी कृष्णा व वारणा नदीला पूर आला होता. पूरपरिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीच्या घरपड अनुदानात वाळवा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा सुरू होती. पूरपट्टयातील सर्वसामान्य जनता अनुदानापसून वंचित राहिली आहे. काहींना अनुदान मिळाले, तर काहींच्या तोंडाला पाने पुसली गेली. या घोटाळ्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी वाळवा पंचायत समितीस अचानक भेट दिली. वाळवा तालुक्यातील पुरात झालेल्या घरपडीतील अनुदान वाटपाबाबत नागरिकांची त्यांनी माहिती मागवली. त्यासाठी वाळवा तालुक्यातील प्राथमिक स्वरुपात ५ ग्रामसेवकांना पूरग्रस्त निधीबाबत दफ्तर तपासणीसाठी बोलावण्यात आले. यामध्ये वाळवा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या दफ्तरात त्रुटी आढळल्या. संपत माळी यांनी पुरामध्ये ज्यांचा घरांची पडझड झाली नाही. त्या नागरिकांचे खाते नंबर प्रशासनाला देत बोगस लाभार्थ्यांना लाखो रुपयांचा निधी वाटला असल्याचे आढळून आले.

ग्रामविकास अधिकारी संपत माळी यांनी गावातील काही नागरिकांना हाताशी धरुन हा अपहार केल्याचे समोर आले. घरपड नसतानाही ज्यांनी शासनाचे अनुदान घेतले आहे, अशा बोगस लाभार्थ्यांना या कारवाईमुळे आता दणका बसला आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा या ग्रामपंचायतीमधील या कारवाईने तालुक्यातील ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details