सांगली- वाढलेल्या तापमानामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली. पण माझी प्रकृती आता उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे. सांगलीमध्ये नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते.
माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका - वैभव मांगले
प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. प्रयोग संपण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात ही घटना घडली. यानंतर नाटक रद्द करत तातडीने संयोजकांनी मांगले यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सांगलीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आलबत्या-खलबत्या या नाटकाच्या प्रयोगावेळी नाटकाचे मुख्य कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. प्रयोग संपण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात ही घटना घडली. यानंतर नाटक रद्द करत तातडीने संयोजकांनी मांगले यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मांगले यांच्या प्रकृतीबाबत काही क्षणात अफवा उठल्या होत्या.
त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवाही पसरली होती. मात्र, काही वेळातच खुद्द अभिनेते मांगले यांनी सर्व अफवांचे खंडन करत आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले. सांगलीत आज वाढलेले तापमान आणि नाट्यगृहात एसी नसल्याने यासोबतच नाटकातील चेटकीणीच्या भूमिकेचा हेवी कॉस्टयूम यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन चक्कर आल्याचे वैभव मांगले यांनी स्पष्ट केले.