सांगली - यापुढील काळात रस्ते निर्माण करणाऱ्या "बिटूमिन"च्या माध्यमातून अन्नदाता असणारा शेतकरी ऊर्जादाता होईल, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari in Sangli ) यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुणे-बंगळुरू या नव्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा ( Pune-Banglore New Highway Announcement ) करत सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना वरदान ठरणार आहे. ज्या शहरांमध्ये मेट्रो शक्य नाही तिथे भविष्यात हवेतुन बस वाहतूक करण्याचे धोरण असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या दोन महामार्ग लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ( Highway Inaguration Program Sangli ) या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण -भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सांगलीमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातुन जाणाऱ्या जत ते सांगोला आणि बोरगावे-वाटंबरे या 96 किलोमीटर रस्त्यांच्या यामध्ये समावेश आहे. नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा 11 जिल्ह्याशी संपर्क सुलभ मिळणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्याकडे जाणारा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मंत्री गडकरी यांच्या हस्ते या महामार्गांचा लोकार्पण संपन्न झाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.
नितीन गडकरींचे तोडू भरुन कौतुक -या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, देशात उत्तम रस्ते निर्माण करण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. देशात आजवर ज्या गोष्टींची गरज होती, ते खातं गडकरी साहेबांकडे आहे. देशात आमचे पक्षीय मतभेद आहेत पण भारतात हा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पार्टीमध्ये पहिला कार्यक्रम असेल, जो नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली होत असून, जो भारताच्या प्रगतील चालना देणारा आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केलं.
खासदारांचे कौतुक करत पडळकरांना टोला -खासदार संजयकाका पाटील यांच्या कामाचं कौतुक करत तुमच्या काळात जिल्ह्यात चांगली रस्ते निर्माण झाले याचे श्रेय तुमच्या माध्यमातून गडकरी यांना जातं आणि जे चांगलं आहे, त्याला आपण चांगलं म्हंटलं नाही तर पडळकर प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायचे असते. आपण थोडंस मन मोठे दाखवले आणि चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला लागलो तर आणख्या चांगल्या गोष्टी व्ह्यायला लागतात, अशा शब्दात व्यासपीठावर उपस्थिती असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना मंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनाला गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी हा टोला लगावला.
हेही वाचा -Raju Shetti Criticism on Government : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय 5 एप्रिलला घेणार - राजू शेट्टी
बिटुमिनमुळे अन्नदाता होणार ऊर्जादाता -या समारंभाच्या निमित्ताने बोलताना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं निर्माण केले जात आहे. उत्कृष्ट पद्धतीचे रस्ते आज भारतात निर्माण झाले आहेत. हे रस्ते निर्माण करताना वापरल्या जाणाऱ्या बिटूमिन केमिकल पदार्थांच्या निर्मितीसाठी बायोमासच्या माध्यमातून बिटूमिन बनवण्याची टेक्नॉलॉजी निर्माण करण्यात आली आहे. ज्यामुळे अन्नदाता असणारा शेतकरी भविष्यात ऊर्जादातही ठरणार आहे. शेतकऱ्यांना बायोमासच्या माध्यमातून "बिटूमिन" बनवणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरेल, अशा तऱ्हेने अन्नदाता शेतकरी ऊर्जा दात बनणार असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
महापुराच्या पार्श्वभूमीवर नवा महामार्ग -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात महापूर आल्याने वाहतूक खोळंबून मोठा आर्थिक फटका बसतो. त्याचबरोबर वाढणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पुणे-बंगळुरू हा नवा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जो पुणे-सातारा-सांगली या जिल्ह्यातील मागासलेल्या भागातून जाणार आहे. विशेष करून सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, खटाव व सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी भागात जाणार आहे. जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग असून पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पेठ ते सांगली हा रस्तादेखील राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. येत्या तीन-चार महिन्यात या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघेल, अशी माहितीही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली. तर अहमदनगर, दौंड-दहिवडी-सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव मार्गे (कर्नाटक) चिक्कोडी असा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून तोही मंजूर करण्याच्या दृष्टीने निर्णय होईल. सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट, सॅटलाईट पोर्ट लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेईल, याठिकाणी या माध्यमातून एअरपोर्ट देखील निर्माण होईल, त्याबाबत रस्तेदेखील आपण निर्माण करून देऊ, ज्यामुळे सांगली जिल्ह्याचा चौफेर विकास होईल, असा विश्वासदेखील मंत्री गडकरींनी यावेळी व्यक्त केला.
मेट्रोऐवजी हवेतील बस वाहतूक -हवेतील वाहतुकीच्या बाबतीत बोलताना गडकरी म्हणाले, आज मोठ्या शहरांमध्ये मेट्रो निर्माण झालेली आहे. मात्र, छोट्या शहरांमध्ये मेट्रो निर्माण करणे शक्य नाही. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. पण त्याच्याऐवजी हवेतून बस वाहतूक करणं शक्य आहे. त्याच्यासाठी खर्च ही कामी येतो. त्यामुळे भविष्यात 250 लोक बसतील, अशी हवेतील बस वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असेल, विश्वास केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.