सांगली- सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू ( Unseasonal Rain in Sangli District ) आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हतनोली (ता. तासगाव) येथे घडली आहे. आळसंद (ता. खानापूर) येथे वीज पडून एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे.
अवकाळीचा बळी, भिंत कोसळून वृद्ध ठार -मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊसाचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडत आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. रविवारी (दि. 10 एप्रिल) मध्यरात्रीनंतर सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. यामध्ये वादळी वाऱ्याने हातणोली येथील घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने घरात झोपलेल्या एका कुटुंबातील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कमल नारायण माळी, असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.