सांगली -अवघ्या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, वाळवा तालुक्यातील खरातवाडीमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाची लोकसंख्या 1 हजार 278 एवढी असून, गावात 230 कुटुंबांचे वास्तव्य आहे. गावाच्या आसपास अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर कोरोनाचे रुग्ण आढळत असताना खरातवाडीमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. याचे सर्व श्रेय ग्रामस्थांनी कोरोना काळात केलेल्या उपायोजनांना जाते. गावात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच ग्रामस्थांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखले आहे.
मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाने शिरकाव केला, बघता बघता कोरोना वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरात येऊन धडकला. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होते, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला होता. दुसरीकडे मात्र खरातवाडीमधील ग्रामस्थांनी एकत्रीत येत कोरोनाला गावात शिरकाव करू दिला नाही.
खरातवाडीने कोरोनाला रोखले गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीने विविध उपायोजना राबवण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण गावात इलेक्ट्रॉनिक पंपाद्वारे सोडियम क्लोराइड, तसेच फॉलीडॉल पावडरची फवारणी कण्यात येत आहे. परगावाहून गावात आलेल्या लोकांना घरीच राहण्याच्या सक्त सूचना देण्यात येतात. तसेच माहिती पत्रके आणि ध्वनिक्षेपकावरून कोरोनाबाबत लोकप्रबोधन करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी कमिटीची स्थापना केली असून, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. या गावात दुसऱ्या लाटेत देखील आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. यासाठी पंचायत समिती सदस्य ऍड.विजय खरात, सरपंच पृथ्वीराज खरात, उपसरपंच सिंधुताई खरात, ग्रामविकास अधिकारी दीपक गावडे तंटामुक्त अध्यक्ष भानुदास खरात, अविनाश खरात, ग्रामपंचायत कर्मचारी नानासाहेब गायकवाड, पोलीस पाटील कृष्णा खरात हे विशेष परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा -प्रियंका गांधींची फेसबुक पोस्ट.. जहाज वादळात सोडून पळून जाणाऱ्या कॅप्टनची तुलना पंतप्रधानांशी