सांगली -लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेले सांगली शहर आजपासून सुरू झाले आहे. शहरातील दुकाने आणि एसटी सेवा नियमितपणे सुरू झाली आहेत. मात्र, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध कायम आहेत. दुकानांमध्ये आणि बसमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
सांगलीत दुकाने अन् एसटी सेवा नियमित सुरू
सांगली जिल्ह्यात ४ मे पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शिथिलता देण्यात येत होती. मात्र, आता सरसकट सर्व दुकाने आणि एसटीला आजपासून परवानगी देण्यात आली आहे. सांगली आगारातून आज दोन महिन्यापासून थांबलेली एसटी पुन्हा धावली.
जिल्ह्यात ४ मे पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शिथिलता देण्यात येत होती. मात्र, आता सरसकट सर्व दुकाने आणि एसटीला आजपासून परवानगी देण्यात आली आहे. सांगली आगारातून आज दोन महिन्यापासून थांबलेली एसटी पुन्हा धावली. जिल्हाअंतर्गत वाहतूकीसाठी 532 एसटीच्या फेऱ्या सांगली एसटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवशी एसटी सेवेला तुरळक प्रतिसाद मिळाला. एसटी धावू लागल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने नियमितपणे सुरू झाली आहेत. या अगोदर सम-विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली होती. आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. रविवारी मात्र सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. पान टपरी दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकानाच्या आसपास पान, तंबाखू खाऊन थुंकल्यास संबंधित व्यक्ती आणि त्या दुकानदारावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मॉल्स, मोठे मार्केट, चित्रपट गृहे, जलतरण तलाव, खेळाची मैदाने बंद ठेवण्यात आले आहेत.