अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर केल्याप्रकरणी ५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल
मुंबईवरून शिराळयाच्या निगडी खुर्द मध्ये आलेल्या एका तरुणीला शुक्रवारी कोरोना लागण झाल्याचा प्रकार समोर आले आहे. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित तरुणी आणि तिचा भाऊ हे दोघे १६ एप्रिलला आपल्या गावी आल्याचे उघडकीस आले आहे.
सांगली -संचारबंदीत अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर करून एका तरुणीसह तिच्या भावाला मुंबईतून शिराळ्याच्या निगडीमध्ये आणले होते. यातील तरुणीला कोरोना लागण झाल्याचा प्रकार समोर आल्याने याप्रकरणी पोलिसांनी कोरोनाबाधित रुग्णासह 5 जणांच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबईवरून शिराळ्याच्या निगडी खुर्दमध्ये आलेल्या एका तरुणीला शुक्रवारी कोरोना लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित तरुणी आणि तिचा भाऊ हे दोघे १६ एप्रिलला आपल्या गावी आल्याचे उघडकीस आले आहे.
निगडी येथील प्रदीप पाटील यांनी आपली चुलती यांना कॅन्सर उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात अॅडमिट करण्यासाठी सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे ऑनलाईन पासची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी प्रदीप पाटील, गणपती भालेकर आणि वाहन चालक संतोष साळुंखे यांना पास दिले होते. १६ एप्रिल रोजी त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सदर रुग्णाला पोहचवले आणि गावी परतत असताना मुंबई स्थित असणाऱ्या निगडी गावची एक तरुणी व तिच्या भावाला संचारबंदी असताना देखील आपल्या गाडीतून निगडीमध्ये घेऊन आले.
गुरुवारी मुंबईहुन आलेल्या तरुणीला कोरोना लक्षणे आढळल्याने तिला व तिच्या भावाला इस्लामपूरमध्ये क्वारंटाईन करून स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. ज्या मध्ये २४ एप्रिल रोजी तरूणीचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला, यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. बहिण-भावाला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
संचारबंदीमुळे जिल्ह्यात प्रवेश बंद असताना, बहिण-भाऊ हे दोघे मुंबई वरून शिराळा निगडी खुर्द याठिकाणी पोहोचले कसे ? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता प्रदीप पाटील, गणपती भालेराव यांच्या गाडीतून ते मुंबईहून परत आल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी गणपती भालेराव, चालक संतोष साळुंखे, प्रदीप पाटील यांच्यासह कोरोनाबाधित तरुणी व तिचा भाऊ, या पाच जणांच्या विरोधात कलम 188,269,270,34 ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ( ब ) आणि कोविड 19 उपाय 2020 कलम 11 याप्रमाणे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर कोरोनाबाधित कुटुंबसह ११ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्याच बरोबर निगडी खुर्द हे गाव सील बंद करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.