सांगली - सांगली लोकसभा निवडणूक सद्य स्थितीला काँग्रेससह भाजपला डोकेदुखी बनली आहे. काँग्रेस की स्वाभिमानी या घोळात महाआघाडी अडकली आहे. तर भाजपातील गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी आणि अजित घोरपडे यांची निवडणुकीची तयारी, हे भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजप नेते या नाराज नेत्यांची समजूत काढण्यात अडकली आहेत.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्एचपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यमान खासदार संजय पाटील भाजपाकडून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे संजय पाटील यांच्या विरोधात तगडा विरोधक कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला. मात्र सांगलीची जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाते यावर त्यांची भूमिका ठरेल, असे मानले जात आहे.
सांगलीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता !
संध्याकाळपर्यंत महाआघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना माघार घेत काँग्रेसला किंबहुना वसंतदादा घराण्याला ही जागा देण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत प्रतीक पाटील यांनी विशाल पाटील यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन, आपण वसंतदादा घराण्याच्या विरोधात नसून सांगलीची जागा काँग्रेसला मिळेल आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे सांगलीची जागा काँग्रेसला आणि उमेदवारी विशाल पाटील यांना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.