सांगली - राज्यात सुरू झालेला पाऊस लक्षात घेता शेतकरऱ्यांना पेरणीसाठी पुरेसे बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पूर्ण नियोजन केले आहे. बोगस बियाण्यांच्या बाबतीत तालुका स्तरावर पथके नेमून कडक कारवाईचे प्रशासनाला आदेश दिले, असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगलीच्या भवानीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सज्ज - सदाभाऊ खोत
बोगस बियाण्यांच्या बाबतीत तालुका स्तरावर पथके नेमून कडक कारवाईचे प्रशासनाला आदेश दिले, असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
यावेळी खोत म्हणाले, राज्यात उशिरा का होईना, पण मान्सून दाखल झाला आहे. तसेच यंदा समाधानकारक पाऊस पडेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पेरणी करता यावी, यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे, खत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सरकारकडे खत व बियाणांचा पुरेसा साठा आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारकडून घेण्यात येईल. सरकारकडून आधीच शेतकऱ्यांना पेरणी न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही या संपूर्ण परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
बोगस बियाण्यांच्या बाबतीत सरकारकडून कडक धोरण राबवण्यात आले आहे. यासाठी तालुका स्तरावर कृषी विभागाच्या माध्यमातून पथके नेमण्यात आली आहेत. त्याचबरोबरच महसूल ,पोलीस प्रशासन यांनाही सूचना देण्यात आल्या असून बोगस बियाण्यांच्या बाबतीत कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अधिवेशन संपल्यानंतर आपण राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती यावेळी खोत यांनी दिली.