सांगली- प्रधानमंत्री फसल योजना, ही प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे, अशी जोरदार टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता भरीव मदत द्यावी. पीकविमा वर्षासाठी करावा, अन्यथा सरकार विरोधात तीव्र लढा उभारू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. सांगलीच्या तासगावमध्ये नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.
परतीच्या अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील शेतीचे विशेषतः द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी तासगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी पीक विमा योजनेवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
राजू शेट्टी प्रसारमाध्यमांशी बोलताना हेही वाचा - सांगलीत विभागीय आयुक्तांनी केली नुकसानग्रस्त फळबागांसह पिकांची पाहणी
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, की राज्यात सगळीकडे पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याऐवजी भरीव नुकसान भरपाई दिली पाहिजे, तरच शेतकरी जगणार आहे. तसेच हवामान अंदाजावर किवा पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की, खासगी कंपन्यांसाठी? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी एकरी 6 ते 7 हजार रुपये भरले आणि त्यांच्या पदरात 120 ते 130 रूपये आले. त्यामुळे पंतप्रधान फसल योजना ही, प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे का ? हे कळत नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली.
हेही वाचा - परतीच्या पावसाने द्राक्ष बागयतदारांचे मोडले कंबरडे, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
शेती वर्षभर चालते, त्यामुळे पीक विमा योजना ही केवळ 3 महिन्यासाठी न ठेवता वर्षभराची करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत न करता भरीव मदत करावी. अन्यथा, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला.