सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्ट रोजी निर्बंध असताना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. यावरून प्रशासनाने बैलगाडी शर्यत झाल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा दिलेला आहे. त्याबरोबर बैलगाडी शर्यतीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर झरेच्या आसपासच्या 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बैलगाडी शर्यतीवरून प्रशासन विरुद्ध पडळकर संघर्ष; 9 गावात 2 दिवसांसाठी संचारबंदी घोषित पडळकर विरुद्ध प्रशासन संघर्ष -
राज्यात बैलगाडी शर्यतीवरील असणारी बंदी उठवावी, या मागणीसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ऑगस्ट रोजी आटपाडीच्या झरे या आपली गावी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बैलगाडी शर्यत पार पडणार, अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केली आहे. मात्र आता या स्पर्धेवरून महसूल व पोलीस प्रशासन विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर असा संघर्ष सुरू झाला.
शर्यत झाल्यास गुन्हे दाखल करू -
याबाबत मंगळवारी विटा-आटपाडी प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार बाई माने, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेवून तो टाळण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र आमदार पडळकरांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. तर सर्वोच्च न्यायालयाची बंदी आदेश असल्याने कोणत्याही परिस्थितीत शर्यत होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बैलगाडी शर्यतीवरून प्रशासन विरुद्ध पडळकर संघर्ष 9 गावात संचारबंदी घोषित -
गैरपध्दतीने शर्यत आयोजित करणे चुकीचे असुन प्रशासनाला आव्हान देण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे. असे स्पष्ट करत प्रशासनाकडून झरे व पंचक्रोशीत 144 कलमान्वये 17 ऑगस्ट रात्री 12 नंतर 20 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी, जमावबंदी आदेश लागु करून पोलीस प्रशासनाने कडक भुमिका घेतली आहे. झरे गावच्या आसपास असणाऱ्या 9 गावात 2 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे बैलगाडी शर्यत असलेल्या झरे गावात येणे, तेथून बाहेर जाणे, वाहने, बैलगाड्यांची ये-जा, शेजारच्या तालुका आणि जिल्ह्यातील प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.