महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेबरोबर शिंदे हे राष्ट्रवादीसोबत होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांचे घनिष्ट संबंध राहिले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यामध्ये विलासराव शिंदे यांचा मोठा वाटा होता.

निधन

By

Published : Jun 17, 2019, 1:00 PM IST

सांगली- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. विलासराव शिंदे यांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. जिल्ह्यातील तत्कालीन दिग्गज नेते म्हणून ओळख असणाऱ्या राजारामबापू पाटील यांचा 1978 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाळवा मतदारसंघातून विलासराव शिंदे यांनी पराभव केला होता. त्यामुळे राज्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2004 मध्ये सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघाचे निवडणूक लढवत विजय मिळवला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद त्यांनी भूषवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेबरोबर शिंदे हे राष्ट्रवादीसोबत होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांचे घनिष्ट संबंध राहिले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यामध्ये विलासराव शिंदे यांचा मोठा वाटा होता. आष्टा नगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिंदे यांची एकहाती सत्ता राहिली आहे. शिंदे यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. जिल्ह्यातले एक ज्येष्ठ, संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सायंकाळी ४ च्या सुमारास आष्टा येथे विलासराव शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details