सांगली- सांगली, कोल्हापूरमधील महापुराच्या नुकसानीला राज्य सरकार जबाबदार आहे. सरकार या महापुरात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे सरकारच्या अपयशाचे निषेधाचे ढोल काँग्रेस राज्यभर वाजविणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगिलते आहे. थोरात यांनी आज सांगलीत पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महापुराला शासन जबाबदार- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगलीच्या महापुरात बेघर झालेल्या पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी थोरात यांनी मराठा सेवा संघ या ठिकाणी शिबिरामध्ये असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला व त्यांचे सात्वन केले. नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
सांगली, कोल्हापूर आणि सातारामध्ये भीषण स्वरूपाचा महापूर आला असून तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तसेच, या पुरात खूप मोठी हानी झाली आहे. या सर्वाला राज्य शासन जबाबदार असल्याचा थोरात यांनी आरोप केला आहे. पूर आपत्ती बाबत शासनाने योग्य ती खबरदारी बैठका घेणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून अशी कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. त्याचबरोबर चार दिवस उलटूनही राज्य सरकार आणि प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे कार्य केले नाही. परिणामी, ही सर्व परिस्थिती उद्भवली. मात्र, त्यातही सरकार उपायोजना करण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
सरकारच्या या अपयशाचे काँग्रेस निषेधाचा ढोल वाजवून विरोध करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच, सरकारचे मंत्री पूरपरिस्थिती बाबत गंभीर नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपण अपयशी ठरलो असल्याचे सांगावे असे आव्हान, थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार देणार असल्याचे थोरात यांनी यावेळी जाहीर केला आहे.