सांगली - केंद्र सरकारकडून २७ कीडनाशकांवर घालण्यात येत असलेल्या बंदीवर शेतकरी संघटनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. हा निर्णय म्हणजे शेती बुडवण्याचा उद्योग असून यामुळे करोडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. गेल्या ४० वर्षात याच कीडनाशकांवर शेतकऱ्यांनी देशाला अन्न-धान्यात सक्षम केले आहे. त्यामुळे हा शेतकरी विरोधी निर्णय असून शेतीत काय वापरायचे ते शेतकऱ्यांना ठरवण्याचा अधिकार आहे, असे मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले, ते सांगलीमध्ये 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
केंद्र सरकारच्या वतीने शेतीसाठी वापरण्यात येत असलेल्या २७ कीडनाशक, तणनाशक औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर याबाबत ४५ दिवसात सरकारने मते मागवली आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकरी विरोधी निर्णय असल्याचा आरोप शेतकरी अंघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. आजपर्यंत आलेल्या सरकारांनी नेहमीच शेतकरी विरोधी धोरणे राबवली आहेत. नरेंद्र मोदींचे सरकारसुद्धा शेतकरी विरोधी असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. किंबहुना नरेंद्र मोदी यांना शेतीचे काही कळत नाही, अशीच स्थिती आहे. पर्यावरणाच्या नावाखाली कीडनाशकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गेल्या ४० वर्षात याच कीडनाशक, बुरशीनाशक, तणनाशकांच्या जोरावर शेतकऱ्यांनी देश अन्न-धान्य निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण केला आहे.