सांगली - येथील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर विटा-भिवघाट रस्त्याची पावसाने दयनीय अवस्था केली आहे. काम ठप्प झाल्याने रस्त्याचे रूपांतर दलदलीत झाले आहे. या मार्गावर वाहने सरकत जात आहेत. या रस्त्यावरील दलदलीत वाट काढत असलेल्या एका लक्झरी बसचा डांसिंग व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाऊसाने विटा-भिवघाट रस्त्याची झाली दलदल ; रस्त्यावरील चालणाऱ्या गाडीचा डांसिंग व्हिडीओ व्हायरल पावसामुळे जिल्ह्यातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर विटा-भिवघाट रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी पूर्ण रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे. काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हा रस्ता चिखलमय बनला आहे.
रस्त्याचे अक्षरश: दलदलीत रूपांतर झाले आहे. यामुळे या दलदलीतून वाहन चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. पावसाने दुचाकी बरोबरच मोठ्या गाड्याही चालवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या अवस्थेचे चित्र या ठिकाणाहून जाणाऱ्या लक्झरी गाडीच्या अवस्थेवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये गाडी रस्त्यावरून पुढे जाताना सरकत जात असल्याचे पाहायला मिळाले आहे.
चालकाला या चिखलातून गाडी घेऊन जाताना अक्षरशः नाकी नऊ आल्याचे दिसून आले. स्लो डांसिंग केल्या प्रमाणे ही गाडी जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे, हे स्पष्ट होत आहे.