सांगली - हिवाळ्यात नवजात शिशू आणि दहा वर्षाच्या आतील मुलांच्या ( Children In The Winter ) बाबतीत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या या ऋतूमध्ये ( Winter Season ) लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन ( Viral Infections ) म्हणजे साथीच्या आजारांची लागण होते. अनेक वेळा नवजात शिशु ( Newborn Baby ) किंवा लहान मुले त्यांची प्रकृती खूपच खालावून जिवीताला धोकाही पोहोचू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात या मुलांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे असते. हिवाळ्यात नवजात शिशूंची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कशा पद्धतीची दक्षता घायला हवी, याबाबत सांगलीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सुहास कुंभार ( Pediatrician Dr. Suhas Kumbhar ) यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी...
थंडीचा लहान मुलांवर परिणाम -
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंडीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव अधिक प्रमाणात असतो, हिवाळ्यातील कडक थंडी ( Extreme Cold ) साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी असते. सर्दी-खोकला ( Cold-cough ), ताप अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात असतात. थंडीत सर्वाधिक धोका असतो तो नवजात शिशु आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना. त्यामुळे लहान मुलांची काळजी सर्वाधिक घेणे गरजेचे आहे.
नवजात शिशुची काळजी कशी घ्यावी -
थंडीत जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण थंडीच्या बचावासाठी कपडे घालतो. त्याप्रमाणे थंडीत जन्मजात मुलाला उबदार कपडे घातले पाहिजेत. लहान मुलांचे जन्मजात वजन कमी असतं. पण शरिराचा आकार जास्त असल्याने थंडीने शरीराचे तापमान कमी होऊन "हायपोथर्मिया"चा ( Hypothermia ) मोठा धोका असतो. त्यामुळे नवजात शिशुला स्वेटर, कान टोपी, पायमोजे अशी सर्व उबदार कपडे घालणे अत्यंत गरजेचे आहे. या काळजी घेतल्या नाही, तर बाळावर थंडीचा परिणाम होऊन शरीराचे तापमान कमी होते. मग बाळाला हायपोथर्मिया होऊन साखर कमी होणे, बाळ सुस्त पडणे आणि अचानक अत्यावस्थ होऊ शकते. त्यामुळे बाळाचे शरीराचे तापमान ( Body Temperature ) कमी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आईने नेहमी बाळाला त्याच्या सान्निध्यात ठेवले पाहिजे, ज्यामुळे आईची ऊब देखील बाळाला मिळू शकते.
काय आहेत प्राथमिक लक्षणे -
बाळ जास्त झोपू लागलं आहे. दूध पित नाही, अशा गोष्टी समोर आल्यास त्याच्या अंगातील साखर कमी होऊ लागली आहे. त्यामुळे तातडीने डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे असते. तसेच किमान सहा महिने बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. दर 2 तासाला दूध पाजणे गरजेचे आहे. ज्यातून बाळाला आईची ऊब मिळते. दूध मिळते, ताकत मिळते त्यामुळे बाळाची शुगर चांगली राहते. बाळाचा थंडीपासून आपण बचाव करू शकतो.