रत्नागिरी- जिल्ह्यातील विवेक सोहनी यांची ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच विवेक यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मिटिंग हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विवेक यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आले. दरम्यान, विवेक दक्षिण महाराष्ट्रातून अशी कामगिरी करणारे पहिलेच ठरले आहेत.
रत्नागिरी येथील संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमधून पंच म्हणून काम करत असताना, विवेक यांना रत्नागिरीच्या चैतन्य भिडे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१६ साली नागपूर येथे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विवेकने संपूर्ण देशात आठवा क्रमांक मिळवत या यशाची पायाभरणी केली. पुढे २०१७ साली दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बीटर परीक्षेत विवेकने अव्वल स्थान मिळवले. तसेच त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करताना फिडे आर्बीटर हे टायटलही मिळवले.
विवेकने आर्बिटर्सकरीता उपयुक्त अशी तीन सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत. 'त्या'बद्दल त्यांचे अनेक नामवंतांनी कौतुकही केले आहे. विवेक यांनी आंतरराष्ट्रीय पंच पदवीकरिता आवश्यक असलेले चार नॉर्म्स आयआयएफएल (IIFL) मुंबई, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा, मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा आणि गोव्याच्या ग्रँडमास्टर स्पर्धांमध्ये काम करून मिळवले आहे.