रत्नागिरी -जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत आज अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती, ही शक्यता गेले तीन दिवस खरी ठरली.
रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी पहाटेपासून पावसाच्या कोसळधारा
रत्नागिरीत आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी जावली. अनेक भागात पहाटेपासून पावसाच्या धारा कोसळल्या. दक्षिण रत्नागिरीत अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, लांजा आणि राजापूरात अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पाणी साचेल एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसापाठोपाठ हवामान देखील ढगाळ होते. या हवामानामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. ढगाळ वातावरणामुळे पालवी, मोहोरावर तुडतुडा वाढला आहे.
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला
दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. मुंबई आणि पुण्यासह कोकण विभागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत होते. त्यामुळे हवेत उष्माही वाढलेला होता. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. गुरुवारी दुपारी 3 वाजल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, विल्ये, पोचरी या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक दुचाकी चालकांची तारांबळ उडाली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. अनेक भागात जवळपास अर्धा तास पाऊस पडला. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - परभणीत 'बर्डफ्लू' चा धोका; मुरूंबा गावात 700 पक्ष्यांचा मृत्यू, गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर