रत्नागिरी - जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. आंबा घाटातील दख्खन गावाजवळ कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एक झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. साखरपा पोलीस आणि बांधकाम विभागाच्या मदतीने झाड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला.
वादळी वाऱ्याचा फटका -
साखरपासह परिसरात बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील घाटातील दख्खनजवळ एक मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडले. परिणामी वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जेसीबी पाठवून रस्त्यात पडलेले झाड पोलिसांच्या मदतीने बाजूला करून महामार्ग मोकळा केला. तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी -
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पुण्यात वीज कोसळल्याने दोन बालकांचा मृत्यू झाला. या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात सायंकाळच्या सुमारास सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यातही वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये फळबागांसह, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, हळद, केळी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकासह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. मिरज तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब, रस्त्यालगत असलेली अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.