महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

विहीर स्वच्छ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर गावात घडली आहे. विनय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर असे गुदमरुन मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विहिरीच्या तळाशी गॅस तयार झाल्याने, त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रत्नागिरीत विहीर स्वच्छ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

By

Published : Jun 3, 2019, 9:49 AM IST

Updated : Jun 3, 2019, 10:07 AM IST

रत्नागिरी- विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर गावात घडली आहे. विनय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर असे गुदमरुन मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीच्या तळाशी गॅस तयार झाल्याने, त्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


विहिरीत गॅस तयार झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना उतरवणे धोकादायक होते. त्यामुळे पोलिसांनी फिनोलेक्स कंपनीच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते. रात्री उशिरा फिनोलेक्स कंपनीचे पथक दाखल झाले. मात्र अंधारामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला होता.


नेमकी काय आहे घटना -
निवसर सोनारवाडी येथील विनय श्रीपाद सागवेकर हे आपल्या घराशेजारी असलेली विहीर उपसण्यासाठी दुपारी विहिरीत उतरले होते. त्यांच्यासोबत शेजारी राहणारे दोघे काम करत होते. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही विनय सागवेकर विहिरीतून बाहेर न आल्याने, त्यांच्यासमवेत असलेले दोन सहकारी नंदकुमार सिताराम सागवेकर, अनिल गोविंद सागवेकर हे दोघे विहिरीत उतरले. मात्र सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विहिरीत उतरलेले तिघेही विहिरीबाहेर न आल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली.


विहिरीत पाहिल्यानंतर तिघेही बेशुध्द अवस्थेत दिसले. तेव्हा ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पाटील, पोलीस कर्मचारी चेतन उत्तेकर, सुरेश शिरगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अन्य ग्रामस्थांना खाली उतरणे धोकादायक असल्याने नितीन ढेरे यांनी फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले.


रात्री उशिरा फिनोलेक्सच्या अग्निशामक दलाचे जवान निवसर गावात दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. विहिरीत उतरलेल्या तिघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. या घटनेची पोलिसामध्ये नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jun 3, 2019, 10:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details