रत्नागिरी- जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 200 च्या उंबरठ्यावर आली आहे. बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत स्वॅब चाचणी करून बुधवारी जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 196 वर पोहोचली आहे.
रत्नागिरीतील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या उंबरठ्यावर
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 200 च्या उबंरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी 13 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली आहे. सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचे कारण बनली आहे.
विशेष बाब म्हणजे 196 मधील 6 रुग्ण 2 मे पूर्वी कोरोनाबाधित होते. गेल्या 27 दिवसांत एकूण 190 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. नव्याने सापडलेले रुग्ण रत्नागिरीतील 6, कळंबणी रुग्णालयातील स्वॅब घेतलेले 3 जण आणि राजापूर येथील 3 जण आहेत.
दरम्यान, 30 वर्षीय एक व्यक्ती बुधवारी मुंबई येथून रत्नागिरीत आला. प्रवास दरम्यान त्याला मुंबईत नायर रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा व्यक्ती थेट जिल्हा रुग्णालयात येऊन दाखल झाला आहे . यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 196 झाली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता सध्या जिल्ह्यात 115 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.