रत्नागिरी - लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात भाजपने आज रत्नागिरीत आंदोलन करून निषेध नोंदवला. भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या कार्यालयाबाहेर वीजबिल फाडून निषेध नोंदविण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपकडून राजव्यापी आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतही भाजपने नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले. अवास्तव वीजबिल आकारणी संदर्भात महावितरणच्या विरोधात जनतेचा आक्रोश सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
वीजबिल फाडून भाजपचे आंदोलन हेही वाचा-मुंबईकरांना दिलासा, वीज बिलापोटी आकारलेली जादा रक्कम ग्राहकांना व्याजासह माघारी मिळणार
या आहेत मागण्या-
लॉकडाऊनच्या कालावधीतील बिले माफ झाली पाहिजेत, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच अशी वाढीव वीजबिले येऊ नयेत. शेतीच्या वापराची वीजबिले पूर्णपणे माफ करावीत, अशीही मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. महावितरणच्या पर्यायाने राज्य सरकारच्या अन्याय्य धोरणाचा निषेध करत बिले फाडून टाकून निषेध नोंदवण्यात आला. तसेच महावितरणच्या अधिकार्यांना वीजबिल माफीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा-वीज बिल प्रकरण : लाथो के भूत बातों से नही मानते…; मनसे नेत्याचा सरकारला इशारा
मनसेने दिला आहे इशारा-
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन पलटी मारली. यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. या मुद्यावरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी टाकली आहे. मनसेने आता मात्र संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारला इशाराच दिला आहे.