रत्नागिरी -तौक्ते चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये महावितरणचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडल्याने, वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.
जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे 144 पथके सध्या कार्यरत आहेत. किनारपट्टी भागात महावितरणला मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपासून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान सध्या महावितरणकडून कोविड रुग्णालये, कोविड सेंटर आणि अन्य रुग्णलये असलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.