रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त असला पाहिजे. यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले. बुधवारी रत्नागिरी येथे तटकरे बोलत होते.
'कोकणातील राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त असला पाहिजे'
खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त करण्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ कोकणासाठी नसून तो गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातही जातो. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाला टोल आकारणी केली जाऊ नये, अशी मागणी मी यापूर्वी केली होती. संसदेतही याबाबत मागणी केली. आता मी नितीन गडकरींची याबाबत भेट घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
भाजपाची भविष्यवाणी 2024ला लुप्त होईल -
आघाडी सरकार पडणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या भाजपावर राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी निषाणा साधला. महाविकास आघाडी सरकार पडेल, अशा भविष्यवाणीच्या अनेक तारखा भाजपाकडून देण्यात आल्या. २०२४ पर्यंत ते अशीच भविष्यवाणी करत राहतील मात्र, २०२४मध्ये ती लुप्त होईल. पुन्हा आघाडी सरकारच सत्तेत येईल, असे म्हणत तटकरे यांनी भाजपाची खिल्ली उडवली.