रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे आणखी एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. 8 नोव्हेंबरच्या एका शिवसेनेच्या कार्यक्रमात त्यांनी दारू विकणाऱ्या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाची पाठराखण केली होती. तसेच पोलीस देखील हफ्ते घेत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला होता. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केला असून त्यांनी पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
आरोप सिद्ध करावा लागेल..
माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केला आहे, व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार भास्कर जाधव कार्यकर्त्यांला सांगतात की, तू दारू अनधिकृतपणे विक, पोलिसवाले काय हप्ता घेत नाहीत काय, ही भाषा एका लोकप्रतिनिधीची आहे. मला लाज वाटते की, हे कोकणातले आमदार आहेत. भास्कर जाधवांचा वैयक्तिक भाग असला, तरी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला आहे. पोलिसांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्र पोलिसांवर आरोप करताना त्यांच्याकडे पुरावे आहेत का? पोलिसांनी कुठे हफ्ते मागितले किंवा असे काही केले, याचे पुरावे आहेत का? महाराष्ट्र पोलिसांबद्दलचा हा आरोप जाधव यांना सिद्ध करावा लागेल. भास्कर जाधव यांनी पोलिसांचा अपमान केलेला आहे, यामध्ये दुमतच नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांनी माफी मागून त्वरित पुरावा द्यावा, ही आमची मागणी असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.