रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. सिंधुदुर्गातही काही ठिकाणी फटका बसला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीसह, गुहागर तसेच दापोली आणि मंडणगडला या वादळाचा फटका बसला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, नुकसान झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
निसर्ग वादळ : नुकसानीचे पंचनामे करून दोन दिवसांत नुकसानीची भरपाई द्या, उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना
चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, हा वादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला मोठा बसला आहे. आपण स्वतः अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. रत्नागिरीतल्या मिरजोळेत घर कोसळून 3 जण जखमी झाले आहेत, तर उंडी गावामध्ये घर कोसळून 1 महिला जखमी झाली आहे. मात्र, जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या सर्व नुकसानीचे पंचनामे करून दोन दिवसात त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सध्या अनेक ठिकाणी पंचनामे सुरू झाले असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली..