महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत चोरांची टोळी गजाआड.. ३२ लाख ६० हजारांचे दागिने व मुद्देमाल हस्तगत

शहर पोलीस स्थानकाच्या पथकाकडून रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक एकमध्ये गस्त घातली जात असताना त्यांना दोन स्त्रिया, दोन पुरूष आणि एक लहान मुलगा सामानासह बसलेले दिसून आले. त्यांच्याबाबत संशय आल्याने पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या बॅगांची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल्स आणि इतर वस्तु आढळून आल्या.

By

Published : Sep 14, 2019, 3:00 PM IST

चोरांच्या टोळीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल

रत्नागिरी- रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या चोरट्यांच्या टोळीकडे सोन्या, चांदीचे दागिने सापडले आहेत. वाशिम येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या या टोळीला गुरूवारी रात्री रत्नागिरी पोलिसांनी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. या टोळीकडे २९ लाख ८५ हजार किंमतीचे एक किलोपेक्षा अधिक सोने, ७ हजार ९२० किंमतीचे ४२२ ग्रॅम चांदीचे दागिने यासह मोबाईल्स, मनगटी घडयाळे, रोख रक्कम असा ३२ लाख ६० हजार ३६८ इतक्या किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस अधीक्षक


पोलिसांनी अटक केलेल्या टोळीमध्ये शिवा राम साखरे (वय३५), ज्योती शिवा साखरे (वय२५), अंजु उर्फ पद्मा शिवा शेट्टी (वय३३), सर्व रा. वाशिम आणि विजय नरेश उर्फ राहूल धारी (वय२१), औरंगाबाद या चौघांचा समावेश आहे. या चौघांविरोधात खेड पोलीस स्थानकात एक, चिपळूण पोलीस स्थानकात दोन, रत्नागिरी आणि देवरूख पोलीस स्थानकात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून या पाचही गुन्ह्यांतील शंभर टक्के मूळ माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या पाच गुन्ह्यांसह अन्य जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-रेल्वे पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण; खेड रेल्वे स्थानकावरील घटना


गणशोत्सवासाठी रत्नागिरीत येणाऱया चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. यामुळे गणपतीच्या कालावधीत एसटी स्टॅण्ड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन परजिल्ह्यातील आणि परराज्यातील गुन्हेगार एसटी आणि रेल्वेस्टेशन येथे किंमती दस्तीऐवज असलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील वस्तु चोरण्याचे प्रमाण वाढले होते. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱयांना मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी जिल्ह्यातील प्रमुख एसटी स्टॅण्ड आणि रेल्वे स्थानकांवर विशेष पथके तैनात केली होती. तसेच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी शहरात स्वतंत्र पथक तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता.


गुरूवारी रात्री रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या पथकाकडून रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक एकमध्ये गस्त घातली जात असताना त्यांना दोन स्त्रीया, दोन पुरूष आणि एक लहान मुलगा सामानासह बसलेले दिसून आले. त्यांच्याबाबत संशय आल्याने पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या बॅगांची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल्स आणि इतर वस्तु आढळून आल्या. दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पंचासमक्ष त्यांच्या बॅगेची झडती घेण्यात आली. यावेळी पिशवीत १ हजार ४१ ग्रॅम २८ मिली वजनाचे २९ लाख ८५ हजार ८४८ किंमतीचे सोन्याचे दागिने, ४२२ ग्रॅम ४४ मिली वजनाचे ७ हजार ९२० किमतीचे चांदीचे दागिने, १ हजार किंमतीची सहा मनगटी घडयाळे, १४ हजार ७०० रूपये किमतीचे मोबाईल्स आणि २ लाख ५० हजार ८०० रूपये रोख असा ३२ लाख ६० हजार ३६८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.'

हेही वाचा-समुद्रातील वादळाने मासेमारी ठप्प, मच्छिमारांना कोट्यवधींचा फटका

ABOUT THE AUTHOR

...view details