रत्नागिरी -केंद्र सरकारने 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यावर 45 दिवसांत सूचना मागवल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये मात्र याबाबत चलबिचल आहे. कारण यातील अनेक कीटकनाशके शेतकरी वापरत असतात. आंबा उत्पादक शेतकरीदेखील यापैकी 8 ते 10 कीटकनाशके वापरतात. तसेच सध्या वापरात असलेली कीटकनाशके शेतकऱ्यांच्या आवाक्यातील आहेत. मात्र, ही कीटकनाशके बंद झाली तर शेतकऱ्यांना जास्त किंमतीची कीटकनाशके घ्यावी लागतील, त्यामुळे पर्यायाने त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडेल. मात्र ज्याअर्थी सरकार या कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा विचार करत आहे, त्याअर्थी या कीटकनाशकांचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा स्वीकार करायला पाहिजे, असाही एक विचार आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.
सध्या आंबा बागायदार वापरत असलेली कीटकनाशके ही भारतात तयार होणारी आणि स्वस्तात मिळणारी जेनरिक कीटकनाशके आहेत. त्यांच्या किंमतीही इथल्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. यातील क्यूनालफॉस हे कीटकनाशक आंब्यावरील किडीसाठी वापरतात. हे कीटकनाशक 400 रुपये लिटर आहे. कार्बेन्डाझिम पावडर ही आंब्यावरील बुरशी रोगासाठी वापरतात, ही 500 रुपये किलो आहे. क्लोरपायरिफॉस हे वाळवी आणि किडीसाठी वापरतात, हे किटकनाशक 400 रुपये लिटर आहे. फेनाक्यूकार्ब हे आंब्यावरील तुटतुडा रोगासाठी वापरतात, हे 550 रुपये लिटर आहे, तर डेल्टामिथ्रीन हे किडीसाठी वापरतात, हे कीटकनाशक 600 रुपये लिटर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकरी ही कीटकनाशके वापरत आहेत. त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून याला मोठी मागणी असते, असे कोकणातील अग्रगण्य असणाऱ्या नंदाई ऍग्रोशॉपीचे मालक तसेच स्वतः एमएससी अग्रीकल्चर असलेले मोहिंदर बामणे सांगतात. तसेच या कीटकनाशकांवर बंदी आली तर शेतकऱ्यांना 2 ते 3 हजार रुपये लिटर असणारी कीटकनाशके विकत घ्यावी लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांना 4 ते 5 पाचपट अधिक भुर्दंड बसेल असेही बामणे सांगतात.