रत्नागिरी - फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत रत्नागिरी येथील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर बीच गेम्स महोत्सवाची मंगळवारी सूरुवात झाली. या निमित्त मुलांसोबतच सर्व अधिकारी आपले वय विसरून बालपणीच्या खेळात रंगल्याचे दृश्य या ठिकाणी सहभागी खेळाडूंना पहायला मिळाले.
क्रीडा व युवक संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने आणि नगरपरिषद रत्नागिरी व भाट्ये ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने या ४ दिवसीय बीच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे, सहायक नियोजन अधिकारी मनोज पवार, शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, भाट्ये ग्रामपंचायतीचे सरपंच पराग भाटकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रारंभी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद करत सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर, उद्घाटनपर भाषणात सुभाष झुंजारे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.