रत्नागिरी - माझा सनातन संस्थेशी संबंध जोडणे हे एक षड्यंत्र असून यामागे शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा हात असल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकरांनी केला आहे. बुधवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षाला आपली उमेदवारी डोईजड जाईल म्हणून माझा सबंध थेट सनातनशी जोडला गेला, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, काँग्रेसच्या विधान परिषद आमदार हुस्नबानो खलिफे, राजीव किर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नवीनचंद्र बांदिवडेकरांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर सनातनशी संबध असल्याचा आरोप झाला होता.सोशल मीडियावरही बांदिवडेकर ट्रोल झाले होते. नेटिझन्सनी काँग्रेस आणि बांदिवडेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती.