रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ७ हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल २५ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ११.५० लाख आहे. या लाभार्थ्यांना ९४३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. अंत्योदय कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १० किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर, बीपीएल व केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो.