रत्नागिरी -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या अनेक परप्रांतीय कामगार राज्यात अडकून पडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातूनही परराज्यातील अनेक कामगार अजूनही आपल्या राज्यात परत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा कामगारांना सध्या विशेष रेल्वेने त्यांच्या गावी पाठविण्याची सुविधा शासनाने करून दिली आहे. रत्नागिरीतून गुरुवारी अशाच जवळपास १ हजार ४०० परप्रांतीय प्रवाशांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे झारखंडकडे रवाना झाली.
रत्नागिरीतून सुटली विशेष श्रमिक एक्सप्रेस, 1 हजार 400 झारखंडवासी कामगार स्वगृही रवाना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातून आपापल्या गावी जाण्याची इच्छा असणाऱ्या 1 हजार 400 कामगारांना घेऊन गुरुवारी रात्री रत्नागिरीतून एक विशेष रेल्वे झारखंडकडे रवाना झाली. रात्री पावने नऊ वाजता ही रेल्वे सुटली.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक राज्यातील कामगार येथे अडकून पडले आहेत. या सर्वांनी आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावी जाण्याची इच्छा असणाऱ्या झारखंड राज्यातील 1 हजार 400 कामगारांना घेऊन गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता रत्नागिरीतून एक विशेष रेल्वे झारखंडकडे रवाना झाली. यावेळी सर्वांचे स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सींगचे पालन तसेच चेहऱ्यावर मास्क आदि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
याआधी दोन दिवासांपूर्वी जिल्ह्यातील 550 कामगार पनवेलवरुन मध्यप्रदेशकडे रवाना झाले होते. इतरही प्रांतातील नागरिकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरू आहेत.