रायगड - मुंबई, पनवेल प्रमाणेच उरण तालुक्यातील बाधितांची आकडेवारीही वाढत आहे. यामुळे येथील अपुऱ्या वैद्यकीय सेवेबाबत उरणच्या पत्रकारांनी एकत्र येऊन, येथील कोरोना बाधितांना येथेच रुग्णसेवा मिळावी, बेडची संख्या वाढवावी, कोरोना चाचणीचे अहवाल तत्काळ मिळावे, डॉक्टर आणि परिचारिका भरती कराव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.
उरण तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द -
कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी कमी करण्यासाठी एकीकडे राज्यशासन धडपड करत असताना, उरण तालुक्याची कोरोना बाधितांच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेले केंद्रच सध्या आजारी पडल्याच्या स्थितीत आहे. येथील सिडको ट्रेनिंग सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचार केंद्रामध्ये पुरेशी कर्मचारी व्यवस्था नसल्याने, येथे हजेरीस असणारे डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगार यांच्यावर येथील कामाचा सर्व भार पडत आहे. यामुळे रजिस्टर नोंदणी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, रुग्ण तपासणी, रुगणांची देखभाल, नवीन रुग्णांची तपासणी त्याचप्रमाणे कोरोना चाचणी अशा सर्व गोष्टींचा ताण हा येथील अपुऱ्या कर्मचारी व्यवस्थेला करावा लागत आहे. यामुळे रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नाही.
उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारेंना दिले निवेदन -
रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावस्थ रुग्णांना पुरेशी व्यवस्था नसल्याने पर्यायाने येथील बाधितांना पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथे व्यवस्था करावी लागत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे येथील कोरोना चाचणीचा अहवाल 4 दिवसांनी येतो. यामुळे चाचणी केल्यानंतर रुग्ण चार दिवस समाजामध्ये मिसळत असतात. यानंतर 4 दिवसांनी अहवाल आल्यानंतर या रुग्णाला घरात अथवा रुग्णालयात राहण्यास सांगण्यात येते. या 4 दिवसांमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात संक्रमण पसरलेले असते. यामुळे चाचणी अहवाल एका दिवसात मिळण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तर सध्या रुग्णांसाठी बेड कमी पडत असल्याने केअर पॉईंट हॉस्पिटल पुन्हा सुरू करावे, अशा मागण्यांसाठी उरण तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. याबाबतचे निवेदन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे पत्रकारांनी सुपूर्द केले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह तत्सम विभागाच्या अधिकारी यांना मेल करण्यात येणार आहे.