रायगड - ख्रिसमस नाताळ व नवीनवर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि पडलेल्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनीही लहान-मोठ्यांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची मस्ती पहायला मिळत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानमध्ये गर्दी केली आहे माथेरानमध्ये पर्यटकांची धूम -
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतावर यावर्षी कोरोनाचे संकट आहे. असे असले तरी पर्यटक मात्र, आनंद साजरा करण्यासाठी माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान सध्या पर्यटकांनी बहरले आहे. गेल्या काही दिवसात वातावरणातील गारवाही वाढला आहे. त्यामुळे पडलेल्या थंडीचा आस्वादही पर्यटकांना माथेरानमध्ये घेता येणार आहे.
माथेरानमधील हॉटेल सजले -
पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेल आणि आजूबाजूचा परिसर सजवण्यात आला आहेत. हॉटेल परिसरात कंदिल, सांताक्लॉज, कँडल्स लावण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या मिठाई, केक, नॉनव्हेजचे विविध प्रकार जेवणात दिले जात आहेत. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी गीते, डान्स, संगीत अशा प्रकारी सोय करण्यात आली आहे.
पर्यटकांसाठी विशेष पॅकेज -
हॉटेल व्यावसायिकांकडून माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पंधराशे ते नऊ हजार रुपयांपर्यंत पॅकेजची सुविधा देण्यात येत आहे. कोरोनाच्या नियमांचे पालनकरून पर्यटकांना सुविधा पुरवल्या जात आहेत. पर्यटकांनी बऱ्यापैकी गर्दी केल्याने हॉटेल व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.