रायगड - जिल्हयात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या अलिबाग तालुक्यात सासवणे कोळीवाडा हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या गावातील 102 रुग्ण सध्या उपचार घेत असून सासवणे कोळीवाडा परिसर कन्टेन्मेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे. गावाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी घेतलेला आढावा सासावणे कोळीवाडा कोरोनाचा हॉटस्पॉट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार केला तर जानेवारी महिन्यापासून गावात कोरोनाचे रूग्ण आढळून यायला सुरुवात झाली. त्यापैकी 28 बरे झाले आहेत. जे सध्या उपचार घेत आहेत ते 102 रूग्ण अगदी अलिकडचेच आहेत. मागील 4 ते 5 दिवसांपासून सासवणे कोळीवाडयात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढते आहे. रोज 15 ते 20 नवीन रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -ड्रग्ज माफिया भूपेंद्र नेगी अटकेत, NCB ची कारवाई
प्रशासनाकडून घेतली दखल
प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून हा परीसर कन्टेन्मेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोळीवाडयातील कुणाही नागरीकांना बाहेर जावू दिले जात नाही. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातील कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. याकामी सासवणे ग्रामपंचायतीचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे तहसिलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.
कोळीवाडा परिसरात दाटीवाटीने आहेत घरे
सासावणे कोळीवाडा हद्दीत 112 घरे आहेत. मात्र ही घरे दाटीवाटीने आहेत. त्यामुळे लागण झालेल्या नागरिकामुळे आजूबाजूच्या दाटीवाटी घरामुळे इतरांनाही लागण होत असल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
आरोग्य विभागाकडून नागरिकांची तपासणी सुरू
मागील 4 दिवसांपासून गावात आरोग्य विभागाचा कॅम्प लावण्यात आला आहे. गावातील कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने अॅन्टीजेन चाचणी केली जात आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येईल त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. हा कॅम्प आणखी काही दिवस चालणार असून गावातील प्रत्येक व्यक्तीची अॅन्टीजन चाचणी केली जाणार असल्याचे तहसिलदार शेजाळ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -दिलासादायक! राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट