रायगड - कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसुत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यास आपण यशस्वी होऊ. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन खबरदारी घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून 56 हजार 256 बाधित आढळले होते. यापैकी 53 हजार 741 कोरोनामुक्त झाले आहेत. 1 हजार 517 जणांचा आठ महिन्यात मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 970 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे.
ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, औषधांचा मुबलक साठा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभावना असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहातात. त्यामुळे, या हंगामात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी रायगड जिल्हा प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी 2 टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर, माणगाव येथे 200 टन ऑक्सिजन साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.