रायगड -विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चार आमदारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. चार आमदारांसह १६४६ जणांवर पोलिसांनी ही कारवाई केली. आमदार जयंत पाटील (शेकाप), आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांना याबाबत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तर इतर ३७ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक राज्यात लागली असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
हेही वाचा - उमेदवारी मागे घ्या; समरजितराजेंच्या आईंना धमकीचे फोन
निवडणूक काळात गुन्हे घडवलेल्या व्यक्तीवर पोलिसांमार्फत प्रतिबंधक कारवाई केली जाते. जिल्ह्यात १६४६ जणांवर पोलिसांनी यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई केली आहे. प्रतिबंधक कारवाई केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून नोटीस बजावली जाते. निवडणूक काळात नोटीस बजावलेल्या व्यक्तींनी कायद्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाते. १६४६ जणांवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईत शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे तर अभिजित कडवे यांच्यावर १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
हेही वाचा - ...मग महाराष्ट्राच्या करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो? - कॉ. विश्वास उटगी
लोकसभा निवडणुकीत मतमोजणीवेळी पारपत्र नसताना अनाधिकृतपणे घुसून आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांनी पत्रकाराला मारहाण केली होती. यावेळी पेणचे आमदार धैर्यशील पाटील, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सांगितले.