रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ठिकठिकाणचे शिलेदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असतानाच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनीही शिवधनुष्य उचलले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने खासदार सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर शिवबंधनात त्यांनी 'मातोश्री' वर जाऊन हातात भगवा घेतला. यावेळी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, मिलिंद नार्वेकर, अर्जुन खोतकर,इ. नेते उपस्थित होते. परंतु, महाड पोलादपूर मतदार संघातील आमदार भरत गोगावले हे यावेळी अनुपस्थित होते.
हेही वाचा कोल्हापूर-उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, धनंजय महाडिकांसह राणा जगजितसिंहांच्या हाती 'कमळ'
प्रमोद घोसाळकर हे पूर्वश्रमीचे शिवसेनेचे असून, त्यांनी दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख पद भूषविले होते. यानंतर चार वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून सुनील तटकरे यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती. प्रमोद घोसाळकर हे सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे प्रमोद घोसाळकर यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, घोसाळकर यांनी पक्ष सोडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.