महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुक्त मनोरुग्णाला ठेवले स्वच्छतागृहात; अलिबाग कोरोना केंद्रातील प्रकार

अलिबाग जिजामाता रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कोरोनामुक्त मनोरुग्णाला स्वछतागृहात ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आणि नातेवाईकांचेही दुर्लक्ष झाले असल्याने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा माणुसकी विसरली की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अलिबाग
अलिबाग

By

Published : Apr 27, 2021, 4:03 PM IST

रायगड- कोरोना महामारीत सध्या सगळेचजण माणुसकी विसरले असल्याचे चित्र असले तरी आरोग्य यंत्रणा आजही इमाने-इतबारे रुग्णांची सेवा करीत आहे. मात्र, काही कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे या व्यवस्थेला गालबोट लागले जात आहे. अशीच अलिबाग जिजामाता रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कोरोनामुक्त मनोरुग्णाला स्वछतागृहात ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आणि नातेवाईकांचेही दुर्लक्ष झाले असल्याने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा माणुसकी विसरली की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अलिबाग

अलिबाग तालुक्यातील धोकावडे गावातील गजानन कडू (वय 62) हे मनोरुग्ण आहेत. कडू यांना कोरोनाची लागण झाल्याने नातेवाईकांनी त्यांना जिजामाता कोरोना केंद्रामध्ये दाखल केले. त्यांच्यावर सहा दिवस उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवून कडू यांना घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांनी याकडे दुर्लक्ष केले.

नातेवाईकांनी केले दुर्लक्ष तर रुग्णालय प्रशासनाने झोपवले शौचालयात

कोरोनामुक्त होऊनही नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्यास टाळाटाळ करून पूर्णतः दुर्लक्ष केले. पण, त्याचबरोबर रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका, डॉक्टर यांनीही कोणतीही माणुसकी न दाखवता कडू यांना अस्वच्छ असलेल्या शौचालयात गादी टाकून एखाद्या उकिरड्यावर टाकल्यासारखे टाकून दिले. कडू हे मनोरुग्ण असले तरी त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक मिळणे गरजेचे आहे. मात्र, असे न करता रुग्णालय प्रशासनाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे.

स्वच्छतागृहाची स्थिती

सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेवले वार्डमधील खाटावर
गजानन कडू हे गेले दोन दिवस शौचालयाच्या खोलीत पडून आहेत. सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांनी त्यांना अंघोळ घालून गादीवर ठेवले. त्यानंतर तेथील आरोग्य सेवकांना त्यांना दुसरीकडे हलविण्यास सांगितले. मात्र, सेवकांनी दुर्लक्ष करून तो मनोरुग्ण आहे तेथेच राहू दे, अशी उत्तरे दिली. अखेर ही बाब बाहेर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बड्या मुकादम आणि त्याचा एक मित्र यांनी गजानन कडू यांना उचलून वार्डमधील खाटावर झोपवले.
दुसरीकडे त्याची व्यवस्था करू - जिल्हा शल्यचिकित्सक
जिजामाता कोरोना केंद्रामध्ये घडलेली घटना खरी आहे. कोरोनामुक्त मनोरुग्णाचे नातेवाईक त्यांना नेण्यास आलेले नाहीत. त्यांना आम्ही दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न करीत असून लवकरच एखाद्या आश्रमात त्यांना ठेवण्याची पावले उचलत आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
जिजामाता रुग्णालयातील स्वच्छतागृहच अस्वच्छ
जिजामाता कोरोना केंद्रामध्ये कोरोनाचे रुग्ण ठेवले जात आहेत. या ठिकाणी असलेले स्वच्छतागृह हे अस्वच्छ असून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाने आधीच त्रस्त झालेले रुग्ण या शौचालायच्या अस्वच्छतेमुळे पुन्हा आजारी पडू शकतात. त्यामुळे याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देऊन रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details