रायगड - शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते हे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. ही निवडणूक मी विकासाच्या मुद्यावर व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे यावेळीही शिवसेना भाजपचेच सरकार येणार असा विश्वास गिते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी गिते म्हणाले, की सलग सहा वेळा मला खासदार म्हणून कोकणचे प्रतिनिधीत्व करता आले असून पुन्हा सातव्यांदा मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहे. यावेळीही २०१४ ला माझ्या समोर उभे राहणारे उमेदवार उभे राहिले आहेत. मात्र यावेळीही शिवसेना भाजपचेच सरकार येणार असे गीते यांनी सांगितले.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शेकाप हा पक्ष सुद्धा आघाडीत सामील झाला आहे, तसेच अलिबाग काँग्रेसचे नाराज माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे तटकरे यांच्याबरोबर मिलन झाले आहे. याबाबत आपण कोणत्या नजरेने बघत आहात. जिल्ह्यातील ही आघाडी नेत्याची झालेली आहे. मात्र कार्यकर्ते व मतदार हे माझ्या सोबत आहेत. त्यामुळे या आघाडीबाबत मी चिंता करीत नाही, अशी प्रतिक्रिया अनंत गीते यांनी दिली.
कोकणात उद्योग आणण्याबाबत आपण प्रयत्न करीत होता व सध्या याबाबत काय स्थिती आहे. यावर गीते म्हणाले, की कोकणात मी कोणताही शासकीय उद्योग आणू शकलो नाही, ही वास्तुस्थिती आहे. मात्र केंद्र शासनाने धोरण केले असून देशात कुठेच नवीन उद्योग उभारणी झालेली नाही. लोटे परशुराम येथे रेल्वे डबे बनविण्याचा उद्योग आणला असून तो लवकरच सुरू होईल. तर अलिबागमधील गेल कंपनीमध्ये बॉटलींग उद्योग सुरू होता, तो आता बंद आहे. मात्र तो पुन्हा सुरू करण्यात येणार असून तशी प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.