रायगड -रायगड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आल्याने प्रशासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर यामुळे वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्याला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. अशात विकेंडला तालुक्यात पर्यटकांची गर्दी असताना पाली-भूतीवली धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही शाळकरी मुले असून ते मुंबई येथील रहिवासी आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना पर्यटक मजा करण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून जात असल्याने अपघात घडत असल्याचे चित्र आहे.
मुंबईहून वर्षा पर्यटनासाठी आलेल्या तिघांचा कर्जतजवळील पाली-भूतीवली धरणात बुडून मृत्यू
कर्जत जवळीत पाली-भूतीवली धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही शाळकरी मुले असून ते मुंबई येथील रहिवासी आहेत.
बुडालेली तिन्ही मुले अल्पवयीन -
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे वर्षा पर्यटनासाठी पसंती देत असतात. अशात मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तालुका पर्यटकांविना सूनसुना झाला होता. मात्र यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट कमी झाल्याने नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या विकेंडला व यावेळीही पर्यटकांची पाऊले वर्षा पर्यटनासाठी वळली होती. अशात 10 जुलै रोजी शनिवारी तालुक्यातील पाली भूतीवली धरणामध्ये तीन अल्पवयीन मुले बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून साहिल हिरालाल त्रिभुके (वय 15 वर्षे), प्रीतम गौतम साहू (वय 12 वर्षे), मोहन साहू (वय 16) वर्षे अशी त्यांची नावे असून सर्व कुर्ला नवापाडा, नानीबाई चाळ येथील राहणारे आहेत.