पनवेल - कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा सोमवारी मध्यरात्री खिडुकपाडा परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळेसमोर बॉम्बसदृष्य वस्तू ठेवणाऱ्याचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या चित्रीकरणावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
कळंबोलीतील सुधागड हायस्कूलच्या समोरील मैदानात एका सिमेंटच्या बॉक्सला घड्याळाला जोडलेल्या 4 वायर जोडलेला 1 बॉक्स आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. या सिमेंटच्या बॉक्सच्या बाजूला काही धारदार शस्त्र आणि खिळे देखील ठोकण्यात आले होते. तसेच या बॉक्समध्ये 12 व्होल्टेजची बॅटरी देखील वापरण्यात आली होती. हे सगळ पाहून तपासणीसाठी दाखल झालेल्या बॉम्ब स्कॉडने ही वस्तू टाईम बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवत ही वस्तू खिडुकपाडा परिसरात नेऊन रात्री निकामी केली होती. त्यानंतर या बॉक्समध्ये कोणता शस्त्रसाठा वापरण्यात आला होता का? हे पाहण्यासाठी मध्यरात्री 2 च्या सुमारास खिडुकपाडा परिसरातच स्फोटके वापरून हा सीमेंटचा बॉक्स तोडण्यात आला. त्यानंतर सिमेंटच्या बॉक्सचे तुकडे जमा करून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे हा टाईम बॉम्ब होता की? कुणाचा खोडसाळपणा होता, हे लवकरच लॅबमधून येणाऱ्या अहवालातून उघड होणार आहे.