रायगड - लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही शेवटची तारीख होती. अखेरच्या दिवशी रायगड लोकसभा मतदारसंघातून आज १४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली आहेत. मात्र, विरोधकांनी एकमेकांविरोधात डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची खेळी खेळली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म असलेले उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत.
रायगड जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. यावेळीही ही खेळी राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात खेळली आहे. आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. तर 3 एप्रिल रोजी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नाम साधर्म असलेल्या अनंत पद्मा गीते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे गीते तर आघाडीचे तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
२१०४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील शाम तटकरे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी अपक्ष सुनील तटकरेला उभा केल्याने त्याने ९८४९ मते घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे विरोधात ही खेळी खेळली आहे. यावेळी एक नव्हे तर दोन अपक्ष सुनील तटकरे उभे केले आहेत. त्यामुळे या नाम साधर्म्यमुळे सुनील तटकरे याच्या मतांवर परिणाम होणार आहे. तर शिवसेनेचे अनधिकृत उमेदवार अनंत गीते याच्या नाम साधर्म असलेला डुप्लिकेट अनंत गीते निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे याचा फटका अनंत गीते यांनाही काही प्रमाणात बसणार आहे.