रायगड- खोपोली प्रशासनाने वेळोवेळी उचललेल्या ठोस पाऊलांमुळे व कडक लॉकडाऊनमुळे खोपोली शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गर्दीचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी केलेल्या सहकार्यामुळे खोपोली नगरपालिका प्रशासन व खोपोली पोलिसांनी नियोजन करुन फक्त सकाळी 11 वाजेपर्यत भाजी मंडई सुरू ठेवली होती. तौक्ते वादळातून नागरिकांना सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 19 मे रोजी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार दुकाने पूर्ण वेळ सुरुवात ठेवण्यात येणार असल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खोपोली भाजी मंडईतील गर्दी ओसरू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन नियमावलीचा अनेक उद्योग धंद्याना दिलासा
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून, अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने आता पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे एक पत्रक 19 मे रोजी जाहीर केले आहे. या नवीन नियमावलीनुसार किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन, मटण, मासळी विक्रेते, रेशन दुकानदार, फेब्रिकेशनची कामे करणारी अस्थापने, शेतीची अवजारे व या संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे आदी तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअरची दुकाने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. सध्या ही दुकाने सकाळी अकरा नंतर बंद करण्यात येत आहेत. मात्र नवीन आदेशानुसार आता ही दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवता येणार आहेत.
भाजी मंडई संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार