उरण (रायगड) - उरण तालुक्यात आठ दिवसांपूर्वी फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, करंजा गावामुळे उरण तालुका आता रेड झोनमध्ये आला आहे. एकट्या करंजा गावात कोरोनाबाधितांची संख्या 98 वर पोहचली असून, यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करंजा गावातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास एक अंत्ययात्रा कारणीभूत ठरली आहे. गावातील शेकडो लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे शासनाचे नियम न पाळणे आणि सोशल डिस्टन्सिंग टाळणे हे करंजाकरांना चांगलेच महागात पडले आहे.
अंत्ययाेत्रत सहभागी नागरिक कोरोनाबाधित झाल्याने करंजा गाव केले सील... हेही वाचा...लॉकडाऊन-४: आत्मनिर्भर भारताकडे जाण्याची पायरी!
उरण तालुक्यातील करंजा गावात पंधरा दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गावातील तसेच तालुक्यातील आणि इतर ठिकाणचे नातेवाईक आले होते. तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बाकीच्या कार्यक्रमावेळीही साधारण चारशे ते पाचशे नागरिक जमले होते. यावेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नव्हते. या घटनेनंतर गावात येणाऱ्या आशा सेविकेने ज्या घरात मृत्यू झाला होता, त्या घरातील सदस्यांची तपासणी करण्यास सांगितली. मात्र, तेव्हा त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला.
आरोग्य प्रशासनाने त्यानंतर पोलिसांच्या मदतीने एका 43 व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात एकच घबराट उडाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कुटूंबातील व्यक्तीची तपासणी केली. 10 मे रोजी 20, 11 मे रोजी 27, 12 मे रोजी 5 तर 13 मे रोजी 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता हा आकडा 98 वर पोहचला आहे.
हेही वाचा...राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी; आरोग्यमंत्र्यांची माहिती
करंजा गावातील शेकडो नागरिक अंत्ययात्रेत गेले असल्याने गावातील अजून काही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अंत्ययात्रेत जाणे करंजाकरांना चांगलेच महागात पडलेले दिसत आहे. सध्या प्रशासनाने करंजा गाव पूर्णपणे सील केले असून कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. असे असतानाही उरण तालुक्यातीळ करंजा गावात मात्र या सूचनेला फाटा देण्यात आला. त्याचेच परिणाम आता गावकऱ्यांना भोगावे लागत आहे.