रायगड -उरण तालुक्यातील फुंडे, डोंगरी आणि पाणजे या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील सिडकोने बांधलेला पूल कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराला गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली आहे. काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेला हा पूल रहदारीचा ताण नसतानाही कोसळल्याने याबाबतची चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
तरुणाला जेएनपीटी रुग्णालयात हलविण्यात आले-
सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. या विकासकामाअंतर्गत शहरांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, वीज, नाले, पाणी यासारख्या सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ही कामे योग्यपद्धतीने होत नसल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. उरण शहराशी डोंगरी, पाणजे आणि फुंडे या तीन गावांना जोडणाऱ्या मार्गावर अशाच प्रकारे सिडकोच्या माध्यमातून रस्ते बांधण्यात आले आहेत. यातील एका रस्त्यावर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल आज अचानक कोसळून अपघात झाला आहे. काँक्रीटचा हा पूल अचानक कोसळल्याने येथून दुचाकीवरू जाणारा एक तरुण या कोसळणाऱ्या पुलासोबत खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. यावर तात्काळ उपचार व्हावे म्हणून या तरुणाला जेएनपीटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, या अपघाताची तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.