रायगड -उरण तालुक्यातील करंजा-कोंढारीपाडा येथील बाळकृष्ण ठाकूर या 54 वर्षीय गृहस्थाने विहीर खोदली. गावातील पाणी टंचाई पाहता, गावातील मुलाबाळांची पाण्यासाठी परवड होऊ नये म्हणून त्यांनी चार वर्षे मेहनत घेत एकट्याने स्वतःच्या जागेत विहीर खोदली. स्वतःला मुलबाळ नसताना गावातील इतर मुलांची काळजी करून विहीर खोदणाऱ्या या अवलीयाचे कौतुक केले जात आहे.
गावातील मुलाबाळांची पाण्यासाठी परवड होऊ नये म्हणून बाळकृष्ण यांनी एकट्याने विहीर खोदली पाणी टंचाईवर मात करण्यासाठी घेतला पुढाकार -
करंजा, कोंढारीपाडा येथे राहणारे बाळकृष्ण ठाकूर हे व्यवसायाने सुतार आहेत. लाकडी मासेमारी नौका बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मात्र, सध्या फायबर बोटींचा वापर वाढू लागल्याने त्यांचे लाकडी बोटी बांधण्याचे काम बंद झाले आहे. यामुळे बाळकृष्ण ठाकूर यांच्या हाताला आता काम नाही. घरी बसून काय करावे हा विचार करत असताना गावातील पाण्याच्या दुर्भिक्ष्याची समस्या त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी मिळत असलेल्या वेळेचा उपयोग करून विहीर खोदण्याचा विचार केला. त्यांना स्वतःला मुलबाळ नाही मात्र, पाण्यासाठी गावातील मुलाबाळांची परवड होऊ नये, असा विचार त्यांनी केला. दररोज चार तास काम करत, चार वर्षे मेहनत घेऊन त्यांनी एकट्याने ही विहीर खोदली आहे. स्वमालकीच्या जागेत ही विहीर खोदली असली तरी ही विहीर सर्व ग्रामस्थांना पाण्यासाठी खुली केली आहे.
जिल्हापरिषदेने मदत करावी, ग्रामस्थांची मागणी -
संपूर्ण गावाचा विचार करून, कठीण कातळातून ठाकूर यांनी विहीर खोदली. ती गावच्या नागरिकांसाठी खुली करणाऱ्या बाळकृष्ण ठाकूर या जिद्दी अवलियाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. मात्र, त्यांनी घेतलेले परिश्रम लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने मदत करावी, अशी मागणीही आता जोर धरत आहे.