रायगड - ढोल- ताशाचा गजर,थरावर थर चढवणारे गोविंदा, शिट्टीच्या आवाजातील शिस्तबद्ध हालचाली आणि तोल सांभाळत शेवटच्या थरावर चढणारा गोविंदा.... या वातावरणात साई तेज प्रतिष्ठानची दहीहंडी पार पडली. पूरग्रस्तांबाबत सामाजिक भान जपून मोठ्या आयोजकांनी दहीहंड्या रद्द केल्या होत्या. यामुळे सकाळपासून गोविंदामध्ये काही प्रमाणात निराशा होती. मात्र, रात्री साईतेज प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये सिने अभिनेता अंकुश चौधरीने गोविंदाना दुनियादारी चित्रपटाच्या गाण्यांवर थिरकायला लावले.
महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांच्यातर्फे साईतेज प्रतिष्ठानच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमधील या दहीहंडी उत्सवात अंकुश चौधरीने आपल्या परफॉर्मन्सवर सर्वांनाच नाचवले. अभिनेता अंकुश चौधरी समोर गोविंदानी त्याच्या गाजलेल्या अनेक डायलॉग्सची फर्माईश केल्यावर अंकुशने अनोख्या अंदाजात चित्रपटातील डायलॉग्स बोलून दाखवले.
पनवेलमध्ये स्वागत करण्यासाठी स्थानिकांनी अंकुश चौधरीला एक मानाची टोपी भेट दिली. ती पाहून अंकुशला दगडी चाळ या चित्रपटाची आठवण झाल्याचे त्याने सांगितले.