रायगड - महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही गैरसमज आहे, असा संदेश जाऊ नये यासाठी माझ्यावर आमदार योगेश कदम यांनी केलेला हक्कभंग प्रस्ताव तातडीने स्वीकारावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी खासदार माझ्या मतदारसंघात येऊन विकासकामांची उद्घाटने करतात. या कार्यक्रमाला आमदार म्हणून बोलाविले जात नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव केला आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी होऊन महाविकास आघाडी स्थापन करून सरकार सत्तेवर आले आहे. उद्धव ठाकरे हे आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कठीण काळात संयमी काम करीत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊ नये, असे ठरले आहे, असे असताना दापोली पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती यांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला. तसेच खासदार म्हणून मी कोकणातील विकास कामांबाबत सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता आहे, असेही तटकरे म्हणाले.
दरम्यान, माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून तो अध्यक्षांनी स्वीकारावा अशी सूचना मी करणार असल्याचे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे. संसदेचा सदस्य म्हणून घटनेने दिलेला बैठकीचा अधिकार मला आहे का हेही तपासा असेही ते म्हणाले आहेत.